तालुक्यातील शिंदाड, सातगाव डोंगरी, सार्वे बु.,वाडी शेवाळा, वाणेगाव, पिंपळगाव,वरखेडी आदी गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीक नष्ट झाले असून जनावरे दगावली, घरे व अनेक दुकाने कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले.
या नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे जलपुरवठा व स्वच्छतामंत्री श्री.गुलाबराव पाटील यांनी केली. त्यांनी थेट शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व गोरगरीब नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महसूल प्रशासन पंचनामे करत असून शासन तातडीने व न्याय्य मदत करेल, असा दिलासा त्यांनी दिला.
गावकऱ्यांशी बोलताना श्री.गुलाबराव पाटील म्हणाले की, “तुमच्या डोळ्यातील अश्रू माझ्यासाठी संदेश आहेत, मदत मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. शासन शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व गोरगरीब नागरिक या सर्वांच्या पाठीशी ठाम उभे आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पाहणी दौऱ्यात आमदार श्री.किशोर पाटील यांनीही लोकांशी संवाद साधत त्यांचे दु:ख जाणून घेतले. ते म्हणाले की, “पूरग्रस्त कुटुंबांना न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत. प्रत्येक शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व गोरगरीब नागरिकाला शासनाकडून योग्य मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू,” असे ते म्हणाले.
या पाहणीदरम्यान प्रांताधिकारी भूषण अहिरे, स्वी सहाय्यक नवलनाथ पाटील,स्वीयसहाय्यक राजेश पाटील, सुनील पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह पाटील तसेच महसूल, आरोग्य, कृषी विभाग व नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
पूरग्रस्त भागात अजूनही प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून गावोगावी पंचनामे करून पीडितांना तातडीने मदत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


Post a Comment
0 Comments