श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी पूर्वीपासून तयार करण्यात आलेल्या चौथऱ्यावर अज्ञात शिवप्रेमींनी मध्यरात्रीच्या सुमारास अश्वारूढ श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थ, शिवप्रेमी आणि प्रशासन यांच्यात दिवसभर चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरखेडीचे पोलीस पाटील बाळूभाऊ कुमावत यांनी तत्काळ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, बीट हेडकॉन्स्टेबल सदाशिव इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.वाय.एस.पी.) बापूराव रोहम यांना दिली. माहिती मिळताच (डी.वाय.एस.पी.) रोहम यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन तपास सुरू करण्यात आला.
दरम्यान, गावातील शेकडो शिवप्रेमी, महिला व नागरिक घटनास्थळी जमा झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी पोलिसांनी जमलेल्या नागरिकांशी संवाद साधत विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी पुतळा स्थापित करणे हे कायदेशीर प्रक्रियेच्या अधीन असल्याचे स्पष्ट केले. तसेच पुतळा कोणी आणि कोणत्या परिस्थितीत बसविला याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पुतळा सुरक्षित ठेवण्यासाठी तो सन्मानपूर्वक झाकून ठेवण्याची भूमिका प्रशासनाने मांडली.
मात्र, राज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित ग्रामस्थ व महिलांनी पोलिसांना भावनिक आवाहन करत, "आजचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र असून आमच्या भावना समजून घ्याव्यात," अशी विनंती केली. याचवेळी काही शिवप्रेमींनी पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील तसेच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकरभाऊ काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी उपस्थित शिवप्रेमी, महिला व ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून राज्याभिषेक दिनानिमित्त पुतळ्याचे पूजन, दुग्धाभिषेक व आरती करण्यास परवानगी देण्याची मागणी केली.
यानंतर आमदार किशोर पाटील, मधुकरभाऊ काटे, सरपंच सौ. सविताताई सोनवणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय पाटील, सामाजिक कार्यकर्त्या लताबाई पाटील ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत अश्वारूढ श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक, पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय, किशोर आप्पा तुम आगे बढो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, "हा पुतळा अनधिकृतरीत्या बसविण्यात आला असला तरी त्यासाठी आवश्यक असलेली शासकीय परवानगी मिळविण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन संध्याकाळपर्यंत पुतळा दर्शनासाठी खुला ठेवण्यात यावा आणि त्यानंतर अधिकृत परवानगी मिळेपर्यंत तो सन्मानपूर्वक झाकून ठेवण्यात यावा." असे आवाहन केले.
तसेच त्यांनी प्रशासनाला विनंती करतांना सांगितले की, "पुतळा नेमका कोणी आणि कशा परिस्थितीत बसविला याची शहानिशा पूर्ण होण्यापूर्वी गावातील शिवप्रेमींवर कोणतीही कारवाई करू नये. वरखेडी येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. मात्र अद्याप आवश्यक शासकीय परवानगी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे काही शिवप्रेमींनी राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविला असावा. त्यांच्या भावना लक्षात घेऊन संयमाची भूमिका घ्यावी." अशी भूमिका मांडली.
आमदारांच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत झाले. ग्रामस्थांनी प्रशासनाशी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. तसेच पुतळा उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय परवानग्या प्राप्त करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी ग्रामस्थांनी आमदार किशोर आप्पा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव रोहम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा तसेच उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारणीसाठी शासनाच्या विविध विभागांची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याने या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर चौकशी सुरू आहे. पुतळा स्थापनेमागील वस्तुस्थिती, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि आवश्यक परवानग्यांचा तपशील तपासल्यानंतर पुढील निर्णय शासकीय नियम व कायदेशीर प्रक्रियेनुसार घेतला जाईल, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

Post a Comment
0 Comments