*पिंपळगाव हरेश्वर प्रभारी अधिकाऱ्याच्या बदलीसाठी आमरण उपोषण*
पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी!
पाचोरा प्रतिनिधी -
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सट्टा मटका,पत्यांचे जुगार अड्डे, विमल गुटखा, देशी , विदेशी,गावठी दारू,विक्री, रेती वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यात यावे तसेच पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी कल्याणी वर्मा यांची चौकशी आणि बदली करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते कैलास तांबे पत्रकार, चंदू खरे, निलेश शेलार पाटील,कुंदन बेलदार यांनी दि.१४ एप्रिल रोजी पाचोरा तहसील कार्यालय परीसरात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
पिंपळगाव परिक्षेत्राच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय पोलिस आशीर्वादाने सुरू आहे. या अवैध व्यवसायांमुळे गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहे. प्रचंड प्रमाणात देशी, विदेशी, गावठी दारू विक्री होत असल्याने तरुण व्यसनाधिनतेकडे वळत आहे. लहान मुलांना घुटक्यांचे व्यसन जडत आहे. या सर्व अवैध व्यवसायांना पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि हप्ते वसुली करणाऱ्या काही पोलिसांचे अभय मिळत आहे. तर या सर्व प्रकारांकडे तालुका आणि जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून या पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना वरिष्ठांचे अभय असल्याचा गंभीर आरोप उपोषण करणाऱ्यांनी केला आहे. उपोषणाच्या ठिकाणी पाचोरा पोलिस उप विभागीय अधिकारी बापू रोहम यांनी उपोषण भेट दिली. मागण्यां संदर्भात चर्चा केलीअसता सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध व्यवसाय, पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका, वागणूक आणि दिशाभूल करणाऱ्या कार्यवाही बाबत नाराजी व्यक्त करून या परिसरातील अवैध व्यवसायांचे वास्तव मांडले. गेल्या अनेक वर्षांपासून पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध व्यावसायांमुळे या भागात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डीवायएसपी, पोलिस अधीक्षक जळगाव , नाशिक पोलिस आयुक्त, पोलिस मुख्यालय मुंबई यांचे कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी अनेक निवेदन देऊनही ठोस कारवाई होत नाही आणि पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय बंद न करता जोमाने सुरू असतात. वरिष्ठ पोलीस अधिकारी निवेदनाची आणि तक्रारींची दखल न घेता पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप केला. संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही होत नसल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जोपर्यंत अवैधधंदे पूर्णपणे बंद होत नाहीत आणि संबंधित प्रभारी अधिकारी यांची बदली होत नाही , आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी समाधानकारक कारवाई करीत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. येथे न्याय न मिळाल्यास पोलिस ठाण्याच्या समोर सट्टा, मटका, जुगार खेळत निषेध करणार आणि मुंबई आझाद मैदानावर आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे संकेत दिले.
१४ एप्रिल संविधानाचे जनक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी लोकशाहीचा आधार स्तंभ पत्रकारांना एका भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही आणि बदलीसाठी आंदोलन करण्याची वेळ येते आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी बघ्याची भूमिका घेतात हे दुर्दैवी असल्याचे परखड मत समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी व्यक्त केले. सत्यासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या मागण्या मंजूर करून कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या प्रभारी अधिकारी यांची तत्काळ चौकशी करून बदली करावी अन्यथा आंबेडकरी चळवळ समता सैनिक दल उपोषण, आंदोलन करेल असा इशारा दिला.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते, ॲड . अविनाश भालेराव,किशोर डोंगरे, विशाल हटकर, आण्णा बेलदार, गुरुदास भालेराव, भालचंद्र ब्राम्हणे, खंडू सोनवणे, महेंद्र खेडकर, जेष्ठ पत्रकार आबा सूर्यवंशी, किशोर रायसाकडा,अशोक चौधरी , गौतम सोनवणे, राकेश सुतार, अनवर शेख , छोटू सोनवणे, सुखलाल पवार आदी उपस्थित होते.
.jpg)
Post a Comment
0 Comments