भडगाव – आयडियल पत्रकार संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक चाळीसगाव येथे राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस सूर्यकांत कदम यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संपर्क प्रमुख लक्ष्मण आबा सूर्यवंशी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय कुमार मिश्रा उपस्थित होते.
केंद्रीय सहसचिव जमुना चव्हाण, मुंबई अध्यक्ष सुरेश जयस्वाल आणि पालघर जिल्हा सरचिटणीस रुची सिंह यांची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत पत्रकारांच्या हितरक्षणासाठी विविध प्रस्तावांवर चर्चा झाली तसेच आगामी राष्ट्रीय अधिवेशनाच्या आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात केंद्रीय संपर्क प्रमुख लक्ष्मण सूर्यवंशी यांनी शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की संघटना आज देशातील जवळजवळ २० राज्यांमध्ये कार्यरत असून सुमारे ७००० पत्रकार त्यामध्ये सक्रिय सदस्य आहेत. राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस सूर्यकांत कदम यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघटना अधिक बळकट करण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अध्यक्ष अजय कुमार मिश्रा यांनी महाराष्ट्रात संघटना मजबूतपणे कार्यरत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सूर्यकांत कदम व लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या कार्याचे कौतुक करून सर्व पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले.
बैठकीत महत्त्वाचे संघटनात्मक निर्णय घेण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार डॉ. बी. बी. भोसले (भडगाव) यांची धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर ज्येष्ठ पत्रकार अशोक चौधरी (पाचोरा) यांची जळगाव जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती झाली. या नियुक्त्यांमुळे उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाज अधिक वेगाने होईल, अशी आशा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या बैठकीनंतर वरिष्ठ अधिकारी पाचोरा येथे पोहोचले जिथे केंद्रीय संपर्क प्रमुख लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास हरिओम शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments